- एकूण अटकेची संख्या झाली १७
(Image Source-Internet)
नागपूर :
शासकीय वेतनासाठी बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID) वापरल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी तिघा सहाय्यक शिक्षकांना अटक केली आहे. या तिघांच्या कारवायांमुळे शासनाला तब्बल २५ लाख रुपयांहून अधिक वित्तीय नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, नागपूर विभाग) यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
अटकेतील आरोपींमध्ये सतीश विजय पवार (३४, शाहूनगर, मानेवाडा), प्रज्ञा विरेंद्र मुले (३८, सुर्योदय नगर, म्हालगीनगर) आणि भूमिका सोपान नखाते (३९, सर्वश्री नगर, दिघोरी) यांचा समावेश आहे. हे तिघेही सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते.
तपासात उघडकीस आले की, या आरोपींनी शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडीद्वारे शिक्षक म्हणून नियुक्त्या मिळवल्या. यानंतर सतीश पवारने ऑगस्ट २०२३ पासून तर प्रज्ञा मुले आणि भूमिका नखाते यांनी जून २०२४ पासून शासकीय वेतन घेतले.
या प्रकरणात यापूर्वीच विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, लिपिक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालक अशा १४ जणांना अटक करण्यात आली होती. अलीकडील अटकेनंतर आरोपींची संख्या १७ वर पोहोचली आहे. सायबर पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.