(Image Source-Internet)
मुंबई:
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin) या महत्त्वाकांक्षी योजनेत मोठा गैरव्यवहार समोर आल्याने राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. या योजनेचा लाभ हजारो अपात्र लाभार्थ्यांनी घेतल्याचे उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने वसुलीचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे, यामध्ये निवृत्त महिला शासकीय कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनीही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या प्राथमिक तपासणीत या प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकरणावर गंभीर चर्चा झाली.
२६ लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी?
माहिती तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत होते. अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, त्यांच्या घरी पात्र महिला लाभार्थीच नसल्याचे आढळून आले आहे.
फडणवीस आणि तटकरे यांचा इशारा-
या घोटाळ्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "अपात्रतेच्या आधारे लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल."
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही अशा अपात्र लाभार्थ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यांना शासन माफ करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल-
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सुमारे ४८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत, “घोटाळा कुणी केला?” असा थेट सवाल सरकारला केला आहे.
राज्य सरकारने आता या योजनेतील आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू केली असून, अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून वसुलीची प्रक्रिया वेगात राबवली जात आहे.