(Image Source-Internet)
मुंबई :
गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा दहीहंडी (Dahihandi) उत्सव हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक सण आहे. थरावर थर रचून दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी होतात, काहींना गंभीर दुखापतीही होतात. यावर उपचार करताना येणारा खर्च सामान्य मंडळांसाठी परवडणारा नसतो. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा दीड लाख गोविंदांसाठी अपघाती विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून प्रत्येक गोविंदासाठी ७५ रुपयांच्या विमा हप्त्याने विमा कवच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. विमा प्रक्रियेचा समन्वय आणि अंमलबजावणी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मुंबई विभागातील उपसंचालकांमार्फत करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी क्रीडा विकास निधीतून एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तातडीने विमा उतरविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गेल्या वर्षी एक लाख पंचवीस हजार गोविंदांना विमा कवच देण्यात आले होते.
मात्र काहीजण या लाभापासून वंचित राहिले होते. यंदा त्यामध्ये आणखी पंचवीस हजार गोविंदांची भर घालण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सवात होणाऱ्या अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. या पार्श्वभूमीवर ही विमा योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी दिलासादायक ठरणार आहे.