राजकीय उलथापालथ; तेजस ठाकरेसह २५ जणांचा शिंदे गटात प्रवेश

01 Aug 2025 20:05:38
 
shinde grp
 (Image Source-Internet)
यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यात राजकारणाला नवे वळण लाभले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी धक्कादायक घटना घडली आहे. ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी तब्बल २५ सहकाऱ्यांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
 
हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. या घडामोडीमुळे यवतमाळमधील राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
तेजस ठाकरे यांचा निर्णय – ठाकरे गटात खळबळ
तेजस ठाकरे हे यवतमाळमधील ओळखले जाणारे, सक्रिय ठाकरे गटाचे नेते होते. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करताना सांगितले की, “ही घोडदौड आता अधिक वेगवान होणार आहे.”
 
शिंदे यांनी या कार्यक्रमात महायुती सरकारच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “शेतकरी, श्रमिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही काम करत आहोत. ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ हीच आमची दिशा आहे. महायुतीला मिळालेल्या २३२ जागा जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहेत.”
 
प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये अनेक दिग्गज
या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक माजी जनप्रतिनिधी आणि स्थानिक प्रतिष्ठित नेत्यांचा समावेश होता. यामध्ये नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल आणि सुनीताताई जयस्वाल, वनिताताई मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप मस्के, काँग्रेसच्या दर्शना इंगोले यांचा समावेश आहे.
 
त्याचप्रमाणे, माजी जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्यांक आघाडी) रिझवान खान, अविनाश देशमुख, रूपेश ठाकरे, अमोल पाटील, लोकेश इंगोले, अभय डोंगरे, संतोष बोडेवार, विलास ठाकरे आणि राहुल देहणकर या प्रभावी नेत्यांचाही समावेश झाला.
 
या घडामोडींमुळे ठाकरे गटाची ताकद घटल्याचे बोलले जात असून, शिंदे गटाने यवतमाळमध्ये आपली मुळे अधिक घट्ट केली आहेत.
Powered By Sangraha 9.0