क्रिकेटर शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडत वैभव सूर्यवंशीने अंडर-19 क्रिकेटमध्ये केला विक्रम!

08 Jul 2025 17:52:48
 
Vaibhav Suryavanshi
 (Image Source-Internet)
 
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-19 वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवला, पण खरी चर्चा झाली ती सूर्यवंशीच्या तुफानी खेळीची.
 
संपूर्ण मालिकेत त्याने 71 च्या सरासरीने आणि तब्बल 174.01 च्या स्ट्राईक रेटने 355 धावा केल्या. विशेष म्हणजे, अंडर-19 यूथ वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. हा विक्रम याआधी 2017 मध्ये शुबमन गिलच्या नावावर होता, ज्याने इंग्लंडविरुद्ध 351 धावा केल्या होत्या. आता सूर्यवंशीने त्यालाही मागे टाकलं आहे.
 
सूर्यवंशीने एका सामन्यात फक्त 52 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. यूथ वनडे क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. तसंच, 20 चेंडूंमध्ये अर्धशतकही साकारत त्याने दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान अर्धशतकही आपल्या नावे केलं.
 
आयपीएलमध्ये देखील त्याचा प्रभाव पाहायला मिळाला होता. सात डावांमध्ये 206.55 च्या स्ट्राईक रेटने 255 धावा करत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं होतं.
 
आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या दोन युथ कसोटी सामन्यांकडे लागले आहे. सूर्यवंशी तिथेही आपली छाप सोडतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0