आनंदवार्ता;महिलांना ‘पिंक ई-रिक्षा’ मोफत मिळणार, अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट

31 Jul 2025 17:30:46
 
Pink e rickshaws
 (Image Source-Internet)
सोलापूर :
महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आता ‘पिंक ई-रिक्षा’ (Pink e rickshaw) कोणतीही प्रारंभिक रक्कम न भरता मोफत मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, इतर जिल्ह्यांमध्येही ही योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे.
 
शासनाकडून पूर्ण भरपाई —
पूर्वी या योजनेअंतर्गत महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी 10% रक्कम स्वतः भरावी लागत होती. मात्र, अनेक महिलांचा सिबिल स्कोअर कमी असल्याने त्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या आणि प्रशिक्षणासाठीही कमी प्रतिसाद मिळत होता. ही अडचण लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने ही 10% रक्कम पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
योजना रचनेनुसार ई-रिक्षाच्या किंमतीपैकी 30% अनुदान राज्य सरकार देणार आहे आणि उर्वरित 70% रक्कम बँक कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. एकूण किंमत जवळपास 3.73 लाख रुपये असून, महिलांना केवळ 2.62 लाख रुपयांचे कर्ज घेऊन रिक्षा मिळणार आहे – तेही सुरुवातीला स्वतःकडून एकही रुपया न भरता.
 
690 महिलांनी घेतली पुढाकार-
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 690 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी माहिती दिली की, या निर्णयामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.
 
अर्जासाठी शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2025
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्याआधी महिलांना आरटीओकडून ड्रायव्हिंग परवाना घ्यावा लागेल आणि प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षणानंतर त्यांचा सिबिल स्कोअर बँकेकडे पाठवण्यात येईल.
 
ही योजना केवळ वाहनपुरती मर्यादित नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासनाचा प्रेरणादायक उपक्रम आहे.
Powered By Sangraha 9.0