(Image Source-Internet)
नागपूर :
भारताला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिचा नागपूर शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आला. फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत घवघवीत यश मिळवून परतलेल्या दिव्याचे नागपूर विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात आणि जयघोषात जल्लोषात स्वागत झाले.
दिव्या देशमुखच्या या आगमनाने नागपूरकरांचे चेहेरे आनंदाने उजळले होते. तिच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची, क्रीडाप्रेमींची आणि बुद्धिबळ क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके यांनी दिव्याच्या डोक्यावर फुलांचा मुकुट ठेवत तिचा सन्मान केला. सोबतच, "दिव्या देशमुख अमर रहे", "भारत माता की जय" अशा घोषणा परिसरात घुमत होत्या.
दिव्याशी सेल्फी घेण्यासाठी आणि तिच्या एका झलकसाठी चाहत्यांमध्ये चढाओढ सुरू होती. तिच्या विजयाचा आनंद नागपूरकरांनी फक्त शब्दांतच नव्हे, तर मनापासून साजरा केला. या स्वागत सोहळ्यात विविध सामाजिक संस्था आणि क्रीडा संघटनांनीही सहभाग घेत दिव्याच्या यशाचे कौतुक केले.
स्वतः दिव्यानेही नागपूरकरांच्या प्रेमाने भारावून गेलेली भावना व्यक्त करत म्हटले,माझ्या शहरवासीयांचे हे प्रेम मला शब्दात मांडता येणार नाही. हा मान, हा सन्मान मला अधिक प्रेरणा देतो. आता माझे लक्ष अधिक सराव करून देशासाठी आणखी पदके जिंकण्यावर आहे.
दिव्या देशमुखने आपल्या बुद्धिमत्तेच्या खेळातून भारताला अभिमान वाटावा असा विजय मिळवून दिला आहे. या विजयानंतर तिचे नाव संपूर्ण देशभर गाजले असून, नागपूरच्या या लेकीने बुद्धिबळाच्या पटावर भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला आहे.
तिच्या या ऐतिहासिक यशामुळे नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यात दिव्या देशमुख ही बुद्धिबळ विश्वात आणखी मोठे शिखर गाठेल, असा विश्वास तिच्या स्वागतासाठी जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत होता.