‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरवापर उघड, अपात्र महिलांवर होणार कठोर कारवाई; आदिती तटकरे यांचा इशारा

31 Jul 2025 18:05:02
 
Aditi Tatkare
 (Image Source-Internet)
पुणे :
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून (Ladki Bahin scheme) गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश असतानाही काही अपात्र महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघडकीस आलं आहे. विशेषतः सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून, यावर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
 
या योजनेअंतर्गत, अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करत काही अशा महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला ज्यांचा त्यावर अधिकार नव्हता.
 
अनेक महिलांनी लाभ परत केला – उर्वरितांवर होणार वसुली-
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, "सरकारी सेवेत असलेल्या काही महिलांनी चुकीने या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी अनेकांनी आपले अर्ज स्वेच्छेने मागे घेतले असून, लाभाची रक्कमही शासनाला परत केली आहे. परंतु ज्या महिलांनी अद्याप गैरवापर केला असूनही तो मान्य केलेला नाही, त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांच्या कडून रक्कम वसूल केली जाईल."
 
निकष स्पष्ट; पात्र महिलांना दिलासा-
तटकरे पुढे म्हणाल्या की, "ही योजना सुरू करताना सरकारने नियम आणि निकष अगदी स्पष्ट ठेवले होते. जे महिलांसाठी आरक्षित लाभ आहेत, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. मात्र, फसवणूक करणाऱ्यांना शासन माफ करणार नाही."
 
लाडकी बहीण योजना थांबणार नाहीहा-
योजनेच्या भविष्याबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या, "महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना थांबवण्याचा कोणताही विचार नाही. ही योजना गरजू महिलांसाठी असून, तिचे फायदे केवळ पात्र महिलांपर्यंत पोहोचावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे."
 
या प्रकारामुळे शासनाने आता योजनेची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून, लाभार्थ्यांची पात्रता पुन्हा पडताळून पाहण्यात येणार आहे. यामुळे योग्य महिलांनाच लाभ मिळेल, आणि आर्थिक मदतीच्या नावाखाली होणारा गैरवापर रोखता येईल.
Powered By Sangraha 9.0