(Image Source-Internet)
मुंबई :
मालेगाव (Malegaon) येथे २००८ मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात NIAच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं की, "आतंकवाद कधीही भगवा होऊ शकत नाही, तो होणारही नाही."
विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं की, तपास यंत्रणांकडून सादर करण्यात आलेले पुरावे हे अपुरे व अविश्वसनीय होते. न्यायालयाने आरोपींना शंका लाभ देत निर्दोष ठरवलं असून, पीडितांच्या कुटुंबांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
या निकालामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत त्याला न्यायाचे विजय मानले आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि अन्य विरोधकांनी या निर्णयावर टीका केली असून, तपास यंत्रणांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
फडणवीस यांच्या वक्तव्याकडे भाजपच्या राजकीय भूमिकेचा स्पष्ट संकेत म्हणून पाहिले जात आहे. त्यातून त्यांनी असा दावा केला की, हिंदुत्ववादी विचारधारेचा दहशतवादी कृत्यांशी काहीही संबंध नाही.
या प्रकरणाचा निकाल केवळ न्यायव्यवस्थेच्या पातळीवरच नाही, तर राजकीय चर्चांनाही नव्या उंचीवर नेणारा ठरत आहे. राज्यभरात आणि देशभरात या निर्णयावरून पुन्हा एकदा धर्म, राजकारण आणि दहशतवाद या मुद्द्यांवर मतमतांतरे उफाळून आली आहेत.