लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळे यांची सरकारवर कडवी टीका

30 Jul 2025 11:37:47
 
Supriya Sule
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्य सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठा घोटाळा झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. ४८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत सुळे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, “या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करण्याची प्रक्रिया आहे. सर्वच माहितींची काटेकोर छाननी करून निधी वितरीत केला जातो. मग असं असताना पुरुषांच्या खात्यांमध्ये पैसे कसे गेले? ही बाब अतिशय संशयास्पद आहे.”
 
डीबीटी प्रणालीवरच विश्वास ठेवायचा का?
सरकारने जी Direct Benefit Transfer (DBT) प्रणाली राबवली आहे, तीच विश्वासघातकी ठरल्याचा आरोप सुळे यांनी केला. “हे केवळ तांत्रिक चुकांचे प्रकरण नाही, तर संपूर्ण व्यवस्थाच अपयशी ठरली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
मंत्री नव्हे, शासन जबाबदार-
या प्रकरणी त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर थेट आरोप न करता, संपूर्ण सरकारलाच जबाबदार धरलं. “मी कोणावरही आधाराविना आरोप करत नाही. पण असा मोठा घोटाळा समोर येतो तेव्हा शासनाने एकत्र जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे त्यांनी ठणकावले.
 
घोटाळा स्पष्ट, पण दोषींवर मौन-
पत्रकार परिषदेमध्ये सुळे यांनी सरकारच्या आकडेवारीचा दाखला देत ४८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले. मात्र या घोटाळ्याला कारणीभूत असलेली नावे, प्रक्रिया किंवा दोषी व्यक्तींचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
'डिजिटल इंडिया'वरच प्रश्नचिन्ह-
“जेव्हा सरकार डिजिटल इंडिया आणि पारदर्शक प्रशासनाच्या गप्पा मारतं, तेव्हा अशा चुका न पटणाऱ्या असतात. हा प्रकार महिलांसाठी असलेल्या योजनेची दिशाभूल करणारा असून, सरकारच्या कारभारावरच प्रश्न उभे करतो,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला.
Powered By Sangraha 9.0