(Image Source-Internet)
नागपूर :
शासकीय जबाबदाऱ्यांकडे गंभीरतेने न पाहणाऱ्या एका अधिकाऱ्याविरोधात अखेर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूरमधील एका बारमध्ये मद्यप्राशन करत असताना आणि शासकीय दस्तऐवजांवर सही करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
सदर प्रकार काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे उघडकीस आला. त्या व्हिडिओत सोनटक्के हे बारमध्ये इतर दोन व्यक्तींसोबत मद्यपान करत असताना महाराष्ट्र सरकारच्या गोपनीय फाईल्स पाहताना दिसून आले. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध असून, त्यामधून संबंधित दस्तऐवज हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून नागपूरला आणण्यात आलेले असल्याची माहिती स्पष्ट झाली. त्याचबरोबर, त्या फाईल्स या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत कागदपत्रा असल्याचीही खात्री झाली.
राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर चौकशीला वेग आला आणि दोषी अधिकारी निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.
शासकीय दस्तऐवज हे गोपनीय व संवेदनशील असतात. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः मद्यपानाच्या अवस्थेत त्यावर सह्या करणे हे गंभीर गैरवर्तन मानले जाते. त्यामुळे यापुढेही शिस्तभंगासंदर्भात अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.