ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफचा दबाव; पाकिस्तानसोबतच्या संघर्षातून माघार घेतल्याचं श्रेयही घेतलं

    30-Jul-2025
Total Views |
 
Donald Trump
 (Image Source-Internet)
वॉशिंग्टन :
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करत, भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एकीकडे भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्कावर नाराजी व्यक्त करत टॅरिफ वाढवण्याचा इशाराही दिला.
 
ट्रम्प म्हणाले, "भारत माझा चांगला मित्र आहे, पण त्यांनी अमेरिकन उत्पादने विकत घेताना इतर देशांपेक्षा अधिक कर लावला आहे. मी भारताला पाकिस्तानसोबतचा संघर्ष शांततेने सोडवण्यास सांगितलं आणि त्यांनी तसं केलं."
 
अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नसल्याने, ट्रम्प यांच्या या वक्तव्याकडे महत्त्वाने पाहिले जात आहे. ट्रम्प यांनी सूचित केलं की, भारतावर २० ते २५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा विचार सुरू आहे, जरी यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसला तरी.
 
एअरफोर्स वन विमानात पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, "अनेक देश आमच्यासोबत व्यापार करारासाठी तयार नाहीत. अशा देशांकडून आम्ही अधिक टॅरिफ वसूल करू शकतो." एप्रिलमध्येच अमेरिकेने बेसलाइन टॅरिफ १० टक्के निश्चित केलं होतं. आता त्यामध्ये वाढ करण्याचा विचार सुरू असल्याने जागतिक व्यापारात अस्थिरतेचं वातावरण तयार होऊ शकतं.
 
दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार चर्चेची पुढील फेरी येत्या २५ ऑगस्टला होणार आहे. या बैठकीसाठी अमेरिकेचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या व्यापार करारावर चर्चा होईल.