सायबर गुन्हेगारांचा नवाच फंडा; नागपूरातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ५८ लाखांची उलाढाल; दोघांना अटक

30 Jul 2025 17:58:22
 
cyber crime
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील महाविद्यालयीन युवकांना सायबर गुन्हेगार (Cyber crime) फसवून किरायाने बँक खाते वापरण्यास भाग पाडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर सायबर पोलिसांनी अशा एका प्रकरणाचा छडा लावत दोन तरुणांना अटक केली असून, या प्रकरणात तब्बल ३० बँक खात्यांचा गैरवापर करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे.
 
गुन्ह्याची पद्धत : आर्थिक आमिष दाखवून खात्यांचा वापर-
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यवतमाळचा अविनाश ताकसांडे आणि गोंदियाचा अंश टेंभेकर यांचा समावेश आहे. अविनाश बीसीए तर अंश हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. दोघांनी गुजरातमधील सायबर गुन्हेगारांशी संपर्क साधत त्यांच्यासाठी युवकांकडून बँक खाती उघडून घेतली आणि त्यांचा गैरवापर केला.
 
५८ लाखांचा आर्थिक व्यवहार एका खात्यातूनच
या रॅकेटचा पर्दाफाश नारी येथील स्नेहल साखरे यांच्या तक्रारीनंतर झाला. साखरे हे शहरातील फायर कॉलेजमध्ये प्रशिक्षक असून, त्यांच्या नावावरील बँक खाते गोठवले गेल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. तपासात हे संपूर्ण रॅकेट समोर आलं.
 
विशेष म्हणजे, अविनाशने आपल्या नातेवाइकाचं खाते उघडून अंशच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना दिलं. या खात्यात ५८ लाख रुपयांची उलाढाल झाली. एका खात्याच्या बदल्यात आरोपींना १० हजार रुपये देण्यात आले होते.
 
विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा-
प्राथमिक तपासात, या दोघांनी सायबर गुन्हेगारांना ३० पेक्षा अधिक बँक खाती उपलब्ध करून दिल्याची कबुली दिली आहे. हे खाते फसवणुकीच्या रकमा ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जात होते. विद्यार्थ्यांना फक्त काही हजार रुपयांचं आमिष देऊन त्यांचा वापर केला जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
 
पोलिसांचा इशारा : सावध रहा, सतर्क व्हा
सायबर पोलिसांनी नागरिकांना कधीही अनोळखी व्यक्तीला आपली बँक माहिती देऊ नये, असा इशारा दिला आहे. अशा कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.विद्यार्थ्यांनी कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी न पडता, सावध राहण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने फसवणुकीचं जाळं विणत आहेत, यामुळे जाणीव आणि जबाबदारीने वागणं हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.
Powered By Sangraha 9.0