जयंत पाटील यांना मोठा धक्का;'या' नेत्याचा दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश

30 Jul 2025 17:32:12
 
Jayant Patil
 (Image Source-Internet)
सांगली :
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मतदारसंघात मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मुंबईत भव्य पक्षप्रवेश सोहळा :
मुंबईत झालेल्या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचाही भाजपप्रवेश झाला. यासोबतच डांगे समर्थक अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले.
 
डांगे यांचा राजकीय प्रवास :
डांगे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांपासून केली होती. 1995 मध्ये ते ग्रामीण विकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काही काळापासून ते सक्रिय नव्हते. आता पुन्हा भाजपमध्ये पुनरागमन करत त्यांनी आपल्या मूळ पक्षातच पुनर्वापसी केली आहे.
 
जयंत पाटील यांना धक्का?
विशेष म्हणजे, डांगे यांचे दोन्ही मुले चिमण आणि विश्वनाथ हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते. त्यामुळे डांगे कुटुंबाच्या भाजप प्रवेशामुळे जयंत पाटील यांची सांगलीतील राजकीय पकड ढासळू शकते, असा कयास लावला जात आहे.
 
धनगर समाजाच्या समीकरणांवर परिणाम?
डांगे हे धनगर समाजाचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘धनगर-धनगड’ वादातही आपली ठाम भूमिका मांडली होती. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा धनगर समाजाचा झुकाव भाजपकडे वळवणारा ठरू शकतो, असं मानलं जातं आहे. एकूणच, सांगली जिल्ह्यात भाजपने या प्रवेशामुळे नवसंजीवनी मिळवली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0