तीन पक्षांचा खेळ, पण समन्वय शून्य;अनिल देशमुखांचा महायुती सरकारवर घणाघात

30 Jul 2025 16:10:43

Anil Deshmukh slams Mahayuti govt
(Image Source-Internet) 
गोंदिया :
राज्यातील महायुती सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सध्याच्या राजकारणातील गोंधळ, मंत्र्यांचा बेजबाबदार वर्तन आणि 'लाडली बहिण' योजनेतील गोंधळावर सडकून टीका केली.
 
सरकार तीन पक्षांची, पण एकत्रित निर्णय शून्य-
देशमुख म्हणाले, “भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केलं आहे, पण त्यांच्यात समन्वयाचा पूर्णत: अभाव आहे. मंत्र्यांशी संबंधित काही ना काही वादग्रस्त घटना दर काही दिवसांनी समोर येतात. जनतेच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करून, राजकीय नौटंकी आणि आरोप-प्रत्यारोप यामध्येच सरकार अडकले आहे.”
 
मंत्र्यांचे वर्तन बेजबाबदार, भ्रष्टाचार बिनधास्त-
देशमुखांनी काही मंत्र्यांच्या वर्तनावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “शिवसेनेतील काही मंत्री शॉर्ट्स आणि बनियन घालून लोकांना मारहाण करत आहेत. काहीजण सिगरेट ओढत बिछान्यावर बसलेले असताना, शेजारी रोख रकमेने भरलेली बॅग ठेवलेली दिसते. एका आमदाराच्या रेस्ट हाऊसमध्ये दोन कोटी रुपये कसे सापडतात? कोणी रमी खेळतो, कोणी पैसे मोजतो, हे सगळं जनतेसमोर उघड झालं आहे.”
 
‘लाडली बहिण’ योजनेतील अपप्रवृत्तीवर टीका-
राज्य सरकारच्या 'लाडली बहिण' योजनेवर बोलताना देशमुख म्हणाले, “या योजनेचा हेतू स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा असला तरी यामध्ये १४ ते १५ हजार पुरुषांची नावं नोंदवली गेली आहेत. आधार कार्डवर लिंग स्पष्ट दिसतं, तरी निवडणुकीच्या घाईत नियम धाब्यावर बसवले गेले. जनतेच्या करातून जमा झालेला निधी केवळ मतांसाठी वाटून टाकण्यात आला, ही लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे.”
 
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनांची उधळपट्टी-
देशमुखांनी असा आरोप केला की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार केवळ लोकप्रियतेसाठी योजनांची घोषणा करत आहे. मात्र प्रत्यक्षात जनतेच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई याकडे दुर्लक्ष होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0