पाकिस्तानची कटकारस्थानं सुरूच; आयएसआयने नेपाळमार्गे भारतात हेरगिरीचा डाव उघड

    03-Jul-2025
Total Views |
 
Pakistan conspiracies
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
भारतात गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय नवनवीन मार्गांचा अवलंब करत असून, आता तिने नेपाळमार्गे हेरगिरी करण्याचा कट आखल्याचं उघड झालं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत.
 
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी अन्सारुल मियां अन्सारी या नेपाळी नागरिकाला अटक केली असून तो २००८ पासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडून भारतीय लष्कराची गोपनीय कागदपत्रं, तैनाती संदर्भातील माहिती आणि प्रशिक्षणाशी संबंधित दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत. हे सर्व दस्तावेज तो पाकिस्तानात पाठवण्याच्या तयारीत होता.
 
अन्सारीने तपासात पाकिस्तानी एजंट यासीरसोबत सोशल मीडियावरून संपर्क असल्याची कबुली दिली असून, काही संवेदनशील माहिती असलेली सीडी त्याने पोलिसांची चाहूल लागताच फोडून नष्ट केली. इतकंच नव्हे तर, भारतामध्येही त्याचे अनेक सहकारी असल्याची माहिती मिळाली असून, झारखंडमधील अखलाक आझम हे नाव तपासात पुढे आलं आहे.
 
नेपाळच्या माध्यमातून सुरु असलेली हेरगिरी ही केवळ एक घटना नसून, यामागे मोठं नेटवर्क असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, अन्सारी गोरखपूर मार्गे भारतात दाखल झाला होता. त्याच्या अटकेवेळी पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, गोपनीय कागदपत्रं आणि "Fighting in Built-Up Areas" या १९८२ मध्ये छापलेल्या लष्करी दस्तावेजाची प्रत देखील जप्त केली आहे.
 
तपास अधिक खोलात गेल्यावर दिल्लीमधील आयएसबीटी परिसरात 'पिंटू' नावाच्या व्यक्तीकडून गोपनीय माहिती असलेली सीडी घेतल्याचं अन्सारीने सांगितलं. मात्र, अटक होण्याआधी त्याने ती सीडी फोडली होती. त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि पाकिस्तानशी संबंधित फोन नंबरांचं विश्लेषण सुरू आहे.
 
ही कारवाई केवळ एक व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरणाऱ्या पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कचं आणखी एक प्रकरण असल्याचं स्पष्ट होत आहे. तपास यंत्रणांनी यामागे असलेल्या संपूर्ण रचनेचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.