(Image Source-Internet)
मुंबई :
राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता असून, राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पदावर गडद ढग जमा होत असून, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि शेतकरी वर्गातील वाढत्या नाराजीमुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटाचे माजी मंत्री पुन्हा चर्चेत-
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात एका ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ची शक्यता वर्तवली जात असून, ती म्हणजे शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुनरागमन! पुण्यात एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळे ही चर्चा आणखी रंगली आहे. जरी या भेटीचं अधिकृत कारण ‘आरोग्याची विचारपूस’ असं सांगितलं जात असलं, तरी राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व दिलं जात आहे.
सावंत यांचे मंत्रीपदावर पुनरागमन?
गेल्या नऊ महिन्यांपासून मंत्रिपदापासून दूर असलेले तानाजी सावंत हे पुन्हा एकदा शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळवणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या समर्थकांमध्येही यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सावंत यांच्या पुनरागमनासाठी योग्य संधीची वाट पाहिली जात होती, आणि सध्या कोकाटेंवरचा दबाव ही संधी देऊ शकतो, असं जाणकारांचे म्हणणं आहे.
कोण गमावणार खुर्ची?
जर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली गेली, तर सध्याच्या मंत्र्यांपैकी कुणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, यावरही जोरदार चर्चा सुरू आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह संजय शिरसाट यांचेही मंत्रीपद धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. शेतकरी संघटनांच्या रोषामुळे कोकाटे यांच्यावर ताशेरे ओढले जात असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कोकाटेंची बैठक होणार असल्याचं समजतं.
शिंदे-पवार यांचं समीकरण आणि संतुलन-
राजकीय तजज्ञांच्या मते, शिंदे आणि पवार हे दोघेही मंत्रिमंडळात संतुलन राखण्यासाठी तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या विचारात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते.