(Image Source-Internet)
जळगाव :
पुण्यातील खराडी परिसरात झालेल्या कथित रेव्ह पार्टीमुळे (Rave party) राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्टीदरम्यान अमली पदार्थासारखे घटक आणि मद्य सापडल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.
हे प्रकरण अधिकच गाजू लागले आहे कारण प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी रोहिणी खडसे स्वतः वकीलाच्या भूमिकेत उतरल्या आहेत. न्यायालयीन सुनावणीवेळी त्या वकिलाचा कोट परिधान करून हजर राहिल्या होत्या.
पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजेरी-
प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, जी आता संपली आहे. त्यानंतर आज त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे देखील न्यायालयात उपस्थित होत्या. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या खडसे यांनी पतीच्या सुटकेसाठी कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्णय घेतला असून त्या वकिलाच्या भूमिकेत कार्यरत झाल्या आहेत.
पोलिसांची माहिती घेतली, आता कोर्टात थेट प्रवेश-
याआधी, 28 जुलै रोजी रात्री रोहिणी खडसे यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणातील तांत्रिक माहिती आणि कायदेशीर आरोपांची माहिती मिळवली होती. त्यानंतर लगेचच त्या न्यायालयात वकील म्हणून उपस्थित राहिल्या.
राजकीय आरोपांचीही साखळी सुरू-
या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले असून, "माझ्या जावयाला हेतुपुरस्सर अडवण्याचा प्रयत्न होतोय," असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या राजकीय गुंतागुंतीलाही नकार देता येत नाही. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यांना सुटका मिळणार की पोलिसांकडून अजून काही तपासाची मागणी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.