‘सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही, हे दुर्दैवी’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

29 Jul 2025 20:23:17
 
PM Modi
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
ऑपरेशन सिंदूरवरून (Operation Sindoor) सुरू असलेल्या संसदेतल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. “भारतीय सैन्याच्या पराक्रमाला विरोधकांनी कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांना सैन्यावर विश्वास नाही,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरवर चर्चा भारतासाठी गौरवाची बाब आहे. हे सत्र म्हणजे भारताच्या विजयाचा उत्सव आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडणाऱ्या सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्याची ही वेळ आहे. मी आज संसदेत भारताची बाजू मांडायला उभा आहे आणि ज्या लोकांना ती दिसत नाही, त्यांना आरसा दाखवायला आलो आहे.”
 
मोदी यांनी सांगितले की, “२२ एप्रिल रोजी मी परदेशात होतो. परतल्यावर तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर भारतीय सैन्याला मोकळीक देत निर्णायक कारवाईचे आदेश दिले. पाकिस्तानकडून अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, मात्र आम्हाला आमच्या सैन्यावर विश्वास होता.”
 
“६ आणि ७ मे रोजी आम्ही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्या कारवाईनंतर पाकिस्तान काहीही करू शकला नाही. जगातील १९३ देशांपैकी केवळ ३ देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं. क्वॉड, ब्रिक्ससह जगभरातील अनेक देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र, भारतीय सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसने कधीही समर्थन दिलं नाही,” असा आरोपही मोदींनी केला.
 
पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, “दहशतवादी भारतात दंगली घडवण्याच्या तयारीत होते. निष्पाप नागरिकांवर धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, भारताने हे षड्यंत्र उधळून लावलं. विरोधक या कारवाईविरोधात वक्तव्यं करत आहेत, ते फक्त हेडलाईनमध्ये जागा मिळवतील, पण जनतेच्या हृदयात जागा मिळवू शकणार नाहीत.”
 
सध्या सुरू असलेल्या संसद सत्रात, गृहमंत्री अमित शहा यांनीही विरोधकांवर निशाणा साधत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं. आता पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0