‘ऑपरेशन सिंदूर केवळ एक दिखावा’; खासदार प्रणिती शिंदेंच्या विधानाने संसदेत खळबळ

29 Jul 2025 13:56:51
 
MP Praniti Shinde
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
लोकसभेत सोमवारी (२८ जुलै) ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. “हे ऑपरेशन म्हणजे केवळ एक मीडियासाठीचं नाट्य होतं. प्रत्यक्षात त्यातून देशाला काहीच लाभ झाला नाही,” अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर हल्ला चढवला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात क्षणभर तणाव निर्माण झाला.
 
शिंदे म्हणाल्या, “सरकार ऑपरेशन सिंदूरचे गोडवे गात आहे. मात्र, या कारवाईत नेमकं काय साध्य झालं? किती दहशतवादी पकडले गेले? आपण किती लढाऊ विमानं गमावली? याची कोणतीही स्पष्ट माहिती सरकारकडे नाही. ऑपरेशनची पारदर्शकता कुठे आहे?”
 
सरकारवर गंभीर आरोप-
प्रणिती शिंदे यांनी सरकारवर निवडणुकीच्या तोंडावर जनतेचं लक्ष भरकटवण्याचा आरोप केला. “जनतेला खऱ्या प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी खेळ, मनोरंजन आणि आता दहशतवादाचं माध्यम वापरलं जात आहे. लोकांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जात आहे आणि सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही,” असे ती म्हणाल्या.
 
राजनाथ सिंह आणि जयशंकर यांचे स्पष्टीकरण-
संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. त्यांनी ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक होती, असे सांगितले. मात्र विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर सातत्याने आक्षेप घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
 
नवीन वादाला तोंडफुट-
प्रणिती शिंदे यांचे “ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता” हे वक्तव्य आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाचं कारण ठरत आहे. सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Powered By Sangraha 9.0