‘ऑपरेशन महादेव’मध्ये मोठं यश; पहलगाम हल्ल्याचा मुख्य दहशतवादी मुसा ठार झाल्याची शक्यता

28 Jul 2025 15:56:43
 
Operation Mahadev
 (Image Source-Internet)
श्रीनगर :
श्रीनगरजवळील लिडवास जंगलात सोमवारी (२८ जुलै) भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. ‘ऑपरेशन महादेव’ (Operation Mahadev) अंतर्गत झालेल्या या कारवाईत तीन टीआरएफ दहशतवादी ठार झाले असून, त्यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
 
ही संयुक्त कारवाई लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली असून, अतिरेक्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. लिडवास हे श्रीनगरच्या उपनगरातील जंगलाने वेढलेले ठिकाण असून, हा भाग त्रालशी जोडतो.
 
कारवाईदरम्यान जोरदार चकमक-
सुरक्षा दलांनी जंगल परिसरात घेराव घातल्यानंतर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरू झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, यातील एक दहशतवादी मुसा असून, तो पहलगाम हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार होता.
 
दाछिगाममध्येही शोधमोहीम सुरूच-
लिडवासजवळील दाछिगाम जंगलातही सीआरपीएफ आणि पोलिसांची संयुक्त शोधमोहीम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी येथे संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. सोमवारी या जंगलात गोळीबार सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण झालं. दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
टीआरएफचं बस्तान हादरलं-
दाछिगाम हा टीआरएफ दहशतवाद्यांचा सुरक्षित अड्डा मानला जातो. जानेवारीत याच भागात त्यांच्या लपण्याच्या जागा उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. याशिवाय नियंत्रण रेषेजवळ नुकत्याच झालेल्या स्फोटांची जबाबदारीही या गटाने स्वीकारली होती.
 
नागरिकांना सतर्कतेचं आवाहन-
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर सैनिकी उपस्थिती असून, शोधमोहीम अजूनही सुरूच आहे.
Powered By Sangraha 9.0