नागपूरच्या दिव्या देशमुखची कामगिरी; महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत भारतासाठी रचला इतिहास!

    28-Jul-2025
Total Views |
 
Nagpur Divya Deshmukh
 (Image Source-Internet)
नागपूर :
नागपूरच्या तेजस्वी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. रविवारी पार पडलेल्या 2025 फिडे महिला वर्ल्ड चेस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने ज्येष्ठ खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. या कामगिरीसह दिव्या भारताची चौथी महिला आणि एकूण ८८वी ग्रँडमास्टर ठरली आहे.
 
या अत्युत्कृष्ट अंतिम फेरीत अनुभवसंपन्न कोनेरू हम्पी आणि नवोदित पण प्रतिभावान दिव्या देशमुख यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या दोन क्लासिकल सामन्यांमध्ये चुरशीची लढत रंगली, आणि दोन्ही वेळा सामना बरोबरीत सुटला. या संतुलित खेळीमुळे निकाल टायब्रेकवर गेला.
 
वेगवान निर्णय आणि मानसिक ताकदीची कसोटी असलेल्या टायब्रेक राउंडमध्ये दिव्याने अफलातून खेळ करत सामन्याचा पारडा स्वतःच्या बाजूने वळवला. पहिल्या टायब्रेक गेममध्ये तिने पेत्रोव्ह डिफेन्स वापरत हम्पीला अडवून धरलं. दुसऱ्या गेममध्ये हम्पीच्या क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन्ड स्ट्रॅटेजीला योग्य उत्तर देत दिव्याने संयमित आणि अचूक चालींच्या जोरावर विजयी आघाडी घेतली. हम्पीच्या एका निर्णयातील चूक दिव्याने अचूक टिपली आणि अखेरचा गेम आपल्या बाजूने झुकवला.
 
विजयानंतरचा भावुक क्षण-
विश्वचषक मिळवल्यानंतर दिव्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या क्षणी तिच्या चेहऱ्यावर मेहनत, संघर्ष, आणि अथक प्रयत्नांची छाया स्पष्टपणे दिसत होती. हे यश तिच्या अथक साधनेचं आणि चिकाटीचं फलित होतं.
 
दरम्यान दिव्याच्या या विजयामुळे भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक नवा सोनेरी अध्याय लिहिला गेला आहे. ती केवळ चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली नाही, तर महिला वर्ल्ड चेस कप जिंकणारी आणि ट्रिपल क्राउन पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या यशामुळे हजारो तरुण खेळाडूंना नवी प्रेरणा मिळणार आहे, आणि देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
 
दिव्या देशमुखचं हे यश हे केवळ वैयक्तिक विजय नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचं प्रतीक आहे.