महापालिका निवडणुकांसाठी महायुतीची रणनीती ठरली; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी 'मुंबईवर विशेष लक्ष'!

28 Jul 2025 15:26:14
 
Mahayuti strategy
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांची (Municipal elections) रणधुमाळी सुरू होण्याच्या तयारीत असतानाच महायुतीकडून मुंबईत विशेष रणनीती आखली जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीने हालचालींना वेग दिला आहे. विशेषत: मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे.
 
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे महायुतीची डोकेदुखी-
मुंबई महापालिकेतील राजकीय चित्र हे इतर शहरांपेक्षा वेगळं आहे. विधानसभेत यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बळ मिळालं आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्यासोबत जर त्यांनी युती केली, तर मराठी मतांचा मोठा गट 'ठाकरे ब्रँड'च्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महायुतीने मुंबईत सामूहिक लढतीचा पर्याय विचारात घेतला आहे.
 
पुणे, नाशिक, ठाणे मध्ये स्वतंत्र लढतीचे संकेत-
जरी मुंबईसाठी एकत्रित मोर्चा आखला जात असला, तरी पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणी भाजप स्वतःच्या बळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्ष, नाराजी आणि जागावाटपातील संभाव्य वाद लक्षात घेता इतर शहरांत महायुती न दिसण्याची शक्यता आहे.
 
‘प्लॅन बी’ तयार; ठाकरे बंधूंना विरोधासाठी विशेष योजनेस अंतिम रूप-
राजकीय चर्चांनुसार, ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहील. ही शक्यता लक्षात घेऊन महायुतीने मुंबईसाठी विशेष ‘केंद्रित रणनीती’ तयार केली आहे. गरज भासल्यास 'प्लॅन बी'ही अमलात आणण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
निवडणूक अद्याप जाहीर नाही, पण राजकीय हालचालींना वेग-
महापालिका निवडणुका नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची लगबग, गटबाजी आणि स्थानिक समीकरणं लक्षात घेता पुढील काही आठवड्यांत राजकीय वातावरण आणखी तापणार हे निश्चित आहे.
Powered By Sangraha 9.0