सीताबर्डी फ्लायओव्हरवर थरारक अपघात; भरधाव कारने उडवले दोन वाहनं, तिघे जखमी

28 Jul 2025 13:00:25

Accident on Sitabardi flyover
(Image Source-Internet)  
नागपूर :
शहरात पुन्हा एकदा भरधाव वाहनाच्या बेफिकीरपणाचा परिणाम गंभीर अपघाताच्या रूपात समोर आला आहे. सीताबर्डीतील आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे एका वॉक्सवॅगन कारने दोन वाहनांना धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
 
ही दुर्घटना पहाटे सुमारे ५.४५ च्या सुमारास घडली. झिरो माईलहून टाटा झेस्ट कारने राहत चौकाच्या दिशेने जात असलेल्या पिंटू दाड़े यांच्या मागून एक काळ्या रंगाची वॉक्सवॅगन कार भरधाव वेगाने आली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या कारने समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली.
 
धडक इतकी तीव्र होती की वॉक्सवॅगन कार स्किड झाली आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. त्यामुळे कार आणि मालवाहू दोघांचेही पुढचे भाग पूर्णतः चक्काचूर झाले. या अपघातात वॉक्सवॅनमधील चालक, त्याचा सहप्रवासी आणि आणखी एकजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अपघाताची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवले असून, त्यांच्या प्रकृतीत स्थिरता असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पिंटू दाड़े यांच्या तक्रारीवरून वॉक्सवॅगन कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
 
सीताबर्डीतील आदिवासी गोवारी उड्डाणपूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, अपघाताच्या वेळी वाहतूक कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे नागपूरमधील वाढत्या वाहनगतीवरील नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0