आरबीआयचा मोठा निर्णय : कारवार अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांची चिंता वाढली

    26-Jul-2025
Total Views |
 
Karwar Urban Co op Bank
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकातील कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना 22 जुलै 2025 रोजी रद्द केला आहे. यामुळे 23 जुलैपासून बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्यात आले असून, ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
 
आरबीआयने का घेतला कठोर निर्णय?
आरबीआयने सांगितले की, बँकेकडे पुरेसे भांडवल नाही, तसेच भविष्यातील आर्थिक स्थिती सुधारेल अशी शक्यताही कमी आहे. त्यामुळे बँकेला बँकिंग नियमन कायद्यातील विविध कलमांचे पालन करता आलेले नाही. अशा परिस्थितीत बँक चालू ठेवणं हे सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचं आरबीआयचं स्पष्ट मत आहे.
 
ठेवीदारांचे पैसे सुरक्षित?
आरबीआयच्या आदेशानुसार, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. बँकेच्या माहितीनुसार, ९२.९०% ठेवीदार या विमा योजनेच्या अंतर्गत येतात आणि आतापर्यंत सुमारे ३७.७९ कोटींचं वितरण केलं गेलं आहे.
 
पुढील काय?
कर्नाटक राज्याच्या सहकारी संस्था निबंधकांनी बँकेवर लिक्विडेटर नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेनंतर बँकेची मालमत्ता विकली जाईल आणि शिल्लक रक्कम ठेवीदारांमध्ये वाटली जाईल.
 
महाराष्ट्रातील कोणार्क बँकेवरही नजर
दरम्यान, महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑप बँकेवर एप्रिल 2024 पासून लागू असलेले निर्बंध आता ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आले आहेत.आरबीआयची ही कारवाई सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक मोठा इशारा मानला जात आहे.