(Image Source-Internet)
नागपूर :
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर वादाचा गुन्हा वाढताना दिसतो आहे. सभागृहात मोबाईलवर ‘रम्मी’ खेळताना त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आधीच तणावात असलेल्या कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री ठरवतील कोकाटेंचं भवितव्य –
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुले म्हणाले, “कोकाटे यांच्या वक्तव्यांमुळे व वागणुकीमुळे जर जनतेच्या मनात गैरसमज, नाराजी निर्माण होत असेल, तर अशा गोष्टींबाबत स्वतःहून विचार करणे गरजेचे आहे. सरकारची प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी मंत्रीमहोदयांनी घ्यायला हवी.”
तसंच, “कोकाटे यांच्या मंत्रिपदावर अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असून, त्यांच्या पक्षाचे अध्यक्षही यावर भूमिका स्पष्ट करतील,” असंही बावनकुळे यांनी नमूद केलं.
कोकाटेंच्या विरोधात संतापाचा भडका-
सद्यस्थितीत कोकाटे हे दोन कारणांमुळे चर्चेत आहेत. पहिले, शेतकऱ्यांना "भिकारी" म्हणाल्याने निर्माण झालेला वाद आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात, कामकाज सुरू असताना मोबाईलवर ऑनलाइन रम्मी खेळताना त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकारामुळे जनतेत तीव्र संताप असून, विरोधकांनी त्यांचा तत्काळ राजीनामा मागितला आहे.
फडणवीस-शिंदे-पवार एकमताने नाराज-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही कोकाटे यांच्या वर्तनाबाबत गंभीर असून, त्यांनी याबाबत चर्चा करत एकमत दर्शवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारपर्यंत कोकाटे यांच्या मंत्रिपदावर निर्णय होईल, असा संकेत दिला आहे.
राजीनाम्याची जोरदार मागणी-
सत्ताधाऱ्यांच्या नाराजीसोबतच विरोधकांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृहाच्या मर्यादा पाळण्याऐवजी मोबाईलवर खेळणं आणि शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद भाषा वापरणं हे एका मंत्रीला शोभणारे नाही, असं म्हणत कोकाटे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.