(Image Source-Internet)
जळगाव :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. चव्हाण यांनी खडसेंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.
खडसेंच्या चारित्र्यावर थेट प्रश्नचिन्ह?
पत्रकार परिषदेमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी दावा केला की, खडसे यांच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीकडून काही धक्कादायक माहिती त्यांना मिळाली आहे. “जर मी ती माहिती जाहीरपणे मांडली, तर खडसेंना लोकांसमोर तोंड दाखवणं अवघड जाईल,” असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं.
ते पुढे म्हणाले, “त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, खडसे हे अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवत होते. त्या महिला रात्री त्यांच्याकडे राहत होत्या आणि सकाळी त्यांना सोडायला खाजगी गाड्या यायच्या.” या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच खसखस पसरली.
तुमच्यावरही तितकंच सांगितलं जातं –
“तुम्ही जे आरोप गिरीश महाजन यांच्यावर करता, तसेच आरोप तुमच्यावर तुमच्याच लोकांकडून ऐकायला मिळतात,” असा टोला चव्हाण यांनी खडसेंना लगावला. त्यांनी पत्रकार परिषदेतच खडसेंना थेट खुल्या चर्चेसाठी आव्हान दिलं. “मुक्ताईनगरमध्ये येऊन दोघे समोरासमोर पत्रकार परिषद घेऊ, तुमचं म्हणणं जर सिद्ध झालं, तर मी तुमचा सत्कार करीन,” असं चव्हाण म्हणाले.
राजकीय संघर्ष वैयक्तिक टप्प्यावर?
या साऱ्या प्रकरणामुळे खडसे विरुद्ध भाजप असा संघर्ष केवळ राजकीय मर्यादांपुरता न राहता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे. आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने खडसे यांच्या राजकीय भवितव्यावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
खडसे यांची प्रतिक्रिया अद्याप नाही-
या आरोपांवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली, तरी त्यांच्या गोटातून लवकरच प्रतिउत्तर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जळगावमधील राजकीय वातारण या नव्या वादामुळे अधिकच तापले आहे.