खडकवासला मतदारसंघात फेरमतमोजणीवरुन वाद; आठ महिन्यांनी सुरू झालेल्या प्रक्रियेला राष्ट्रवादी उमेदवाराचा आक्षेप

25 Jul 2025 19:29:07
 
NCP
 (Image Source-Internet)
पुणे :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आठ महिने उलटून गेले असतानाही खडकवासला (Khadakwasla) मतदारसंघात पुन्हा मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, फेरमतमोजणीच्या प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार सचिन दोडके यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने साऱ्या कारवाईवर वादाची छाया पडली आहे.
 
फेरमोजणीची पार्श्वभूमी काय?
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांनी १.६१ लाख मतं मिळवून विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात उभे असलेले सचिन दोडके यांना १.१० लाख मते मिळाली होती. मतमोजणीनंतर दोडके यांनी दोन ईव्हीएम मशिनवरील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी केली होती.
 
फेरमतमोजणीला सुरुवात, पण पुन्हा वाद
आज सकाळी ११ वाजता या फेरमतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, दोडके यांनी व्हीव्हीपॅट स्लिप्सचीही मोजणी व्हावी, असा ठाम आग्रह धरला. विशेष म्हणजे त्यांनी दोन मशीनमधून तब्बल १४०० मतं नोंदवली गेल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली आहे.
 
आयोगाची भूमिका आणि उमेदवाराचा इशारा
राज्य निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले आहे की, केवळ EVM डेटा पडताळणी केली जाईल आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार नाही. ही भूमिका मान्य नसल्याने सचिन दोडके यांनी प्रक्रिया बहिष्काराचा इशारा दिला आहे. त्यामुळे आयोगही पेचात सापडला आहे.
 
राज्यभरात पुन्हा मतमोजणीची मागणी
खडकवासल्याप्रमाणेच, राज्यातील इतर काही मतदारसंघांमध्येही पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या अनेक उमेदवारांनी EVM प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले असून, काहींनी याचिका दाखल करत न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला आहे.
 
फेरमतमोजणीवरून निर्माण झालेला वाद आणि निवडणूक आयोगाची भूमिका यामुळे संपूर्ण प्रक्रिया सध्या चर्चेचा आणि राजकीय वादाचा विषय बनली आहे.
Powered By Sangraha 9.0