(Image Source-Internet)
मुंबई :
हिंदी चित्रपट ‘सैयारा’ (Saiyara) च्या यशाच्या सावलीत मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’ची गळचेपी झाल्याचा आरोप मनसेने करत मल्टिप्लेक्स मालकांना थेट इशारा दिला आहे. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हिंदी-मराठी सिनेमांच्या स्क्रीन्सच्या वाटपावरून वाद उफाळून आला आहे.
‘येरे येरे पैसा 3’ या चित्रपटाचे निर्माते आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आरोप केला की, त्यांच्या चित्रपटाला सुरूवातीला चांगला प्रतिसाद मिळत असतानाही, दुसऱ्याच आठवड्यात थिएटरमध्ये एकाही शोसाठी जागा देण्यात आलेली नाही. यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’ला जाणीवपूर्वक प्राधान्य देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की, "मराठी चित्रपटांच्या हक्कांची पायमल्ली आम्ही सहन करणार नाही. जर मल्टिप्लेक्स मालकांनी मराठी चित्रपटांना योग्य शो आणि स्क्रीन दिले नाहीत, तर मनसेच्या शैलीत उत्तर दिलं जाईल." त्यांनी असा आरोपही केला की, काही थिएटर मालक मुद्दाम मराठी चित्रपटांना डावलतात.
दरम्यान, अमेय खोपकर यांनीही भावना व्यक्त करत म्हटलं की, "मी माझ्या चित्रपटासाठी आंदोलन करणार नाही, पण इथून पुढे काचा फुटणार. अनेकदा मी इतरांच्या साठी उभा राहिलो, पण आज माझ्यासाठी कोणीच उभं राहिलं नाही."
या वादात आता शिंदे गटानेही उडी घेतली असून वांद्रे येथील ग्लोबल मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला स्थान न दिल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी संतप्त आंदोलन केलं. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ही परिस्थिती लवकर बदलली नाही, तर अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
मराठी चित्रपटांच्या स्क्रीन्सवरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय रंग घेत असून, यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील सिनेमागृह व्यवस्थापनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.