(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत (India) आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे. ब्रिटिश पंतप्रधान केर स्टारमर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या नव्या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून व्यापार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
या करारानंतर वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीतील अडथळे दूर होणार असून, आयात–निर्यातीवर असलेली शुल्के टप्प्याटप्प्याने कमी केली जाणार आहेत. यामुळे भारतीय अन्नपदार्थ, मसाले, डाळी, सुकामेवा आदींच्या निर्यातीला अधिक वाव मिळणार असून ब्रिटनमधील ग्राहकांना हे सर्व उत्पादने पूर्वीपेक्षा स्वस्त मिळतील. दुसरीकडे, भारतात येणाऱ्या परदेशी वस्तूंमध्ये बिअर, दारू, कपडे आणि उच्च तंत्रज्ञान उपकरणांचे दर घटण्याची शक्यता आहे.
या करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि नवे रोजगार निर्मितीचे मार्ग खुला होतील. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही वर्षांत भारत–ब्रिटन व्यापाराचे प्रमाण दुप्पटीने वाढण्याची शक्यता असून, 2030 पर्यंत तो 120 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.
सध्या या कराराला ब्रिटनच्या संसदेत मान्यता मिळणे आवश्यक असून, एकदा ती प्रक्रिया पूर्ण झाली की काही महिन्यांतच हा करार प्रत्यक्षात अंमलात येईल.