अनिल अंबानी यांच्या उद्योगसाम्राज्यावर ईडीचा मोठा घाव; देशभरात ५० ठिकाणी छापे

    24-Jul-2025
Total Views |
 
ED Raid to Anil Ambani
 (Image Source-Internet)
मुंबई :
उद्योगजगतामधील मोठं नाव असलेल्या अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या उद्योगसमूहावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी जोरदार कारवाई केली. कथित आर्थिक गैरव्यवहार आणि संशयित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही धाडसत्र सुरू असून, देशभरात एकाच वेळी ५० पेक्षा अधिक ठिकाणी तपास यंत्रणांनी छापे घातले आहेत.
 
रिलायन्स होम फायनान्स तपासाच्या केंद्रस्थानी-
या कारवाईत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीसह त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर व्यावसायिक गटांचाही समावेश आहे. आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप लक्षात घेता, ही छापेमारी ‘प्रिवेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट’ (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे.
 
सेबी, एनएचबी, सीबीआयच्या अहवालांवरून ईडीची कारवाई-
ही तपासमोहीम केवळ संशयावर आधारित नसून, नॅशनल हाउसिंग बँक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या विविध संस्थांच्या अहवालांवर आधारित आहे. तसेच, सीबीआयने दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या एफआयआरही या कारवाईस कारणीभूत ठरले आहेत.
 
अधिकाऱ्यांच्या घरीही ईडीची टाकतंत्री-
कार्यालयांपुरताच हा तपास मर्यादित न ठेवता, ईडीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरीही छापे टाकून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रं, करार, बँक डिटेल्स आणि डिजिटल माहिती जमा केली आहे. या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, काहींना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
 
देशभरात समांतर छापेमारी: मुंबईपासून दिल्लीपर्यंत व्याप्ती-
मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, अहमदाबाद यांसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये हे छापे घालण्यात आले. या कारवाईत व्यावसायिक कार्यालये, बँक खाती, डिजिटल रेकॉर्ड्स आणि महत्त्वाच्या मालमत्ता तपासण्यात आल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही मोहीम आतापर्यंतच्या सर्वात व्यापक कारवायांपैकी एक आहे.
 
आर्थिक संकटात असलेल्या कंपन्यांना बसलेला आणखी एक धक्का-
रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स कॅपिटलसारख्या आधीच कर्जबाजारी स्थितीत असलेल्या कंपन्यांवर ही कारवाई आणखी आर्थिक दबाव निर्माण करणारी ठरू शकते. नियामकांच्या सततच्या चौकश्या आणि बाजारातील विश्वासहरण यामुळे अनिल अंबानींच्या व्यावसायिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.