(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूरातील (Nagpur) गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. बुधवारी (२३ जुलै) दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जवाहरलाल नगर शाळेजवळील इंदिरा कॉन्व्हेंट परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय मायाबाई मदन पेसरकर यांची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून अमानुष हत्या केली.
मृत महिला या स्थानिक रहिवासी असून, त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. कोणताही वादविवाद न करता राहणाऱ्या या महिलेला भरदिवसा, रस्त्यालगत गळा चिरून ठार मारण्यात आल्याने नागरिक स्तब्ध झाले आहेत. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून अनेकांना धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकारी व फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
सध्या हत्येमागील कारण स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांकडून मालमत्तेचा वाद, पूर्वीचे वैमनस्य किंवा अन्य कोणतेही वैयक्तिक कारण याकडे लक्ष देत सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांचे जबाबही तपासले जात आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
सध्या पोलिसांचा तपास सुरू असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.