कृषी मंत्रालयाची सूत्रं अजित दादांनीच हाती घ्यावीत;आमदार रोहित पवार यांची मागणी

    23-Jul-2025
Total Views |
- कोकाटेंच्या वादग्रस्त कृत्यावरून वाद शिगेला;

Rohit Pawar(Image Source-Internet)  
मुंबई :
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विधानभवन परिसरात रमी खेळताना त्यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवण्याची जोरदार मागणी करत कृषी विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारावी, असा आग्रह केला आहे.
 
विधानभवनात खेळ नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत-
कोकाटेंच्या वागणुकीवर टीका करत रोहित पवार म्हणाले, “माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यात भर म्हणून आता विधिमंडळात पत्ते खेळण्याचे कृत्य समोर आले आहे. हा वेळ खेळाचा नसून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा आहे. जर तुम्हाला पत्ते खेळायचेच असतील तर ते घरी खेळा.”
 
अजितदादांनी खात्याची जबाबदारी घ्यावीहाच-
रोहित पवारांनी स्पष्ट शब्दांत कोकाटेंच्या वागणुकीचा निषेध केला. “त्यांनी पत्रकार परिषदेत अहंकाराने संवाद साधला. शेतकऱ्यांना आणि सरकारला भिकारी म्हणणं हे अत्यंत लज्जास्पद आहे. यावरून त्यांना त्वरित राजीनामा द्यावा लागेल,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांकडे कृषी खात्याची सूत्रे घेण्याची विनंती केली. “जर कोकाटेंना बाजूला केले नाही, तर किमान दादांनी स्वतः हे खाते स्वीकारून शेतकऱ्यांचा विश्वास जपावा,” असा रोहित पवारांचा आग्रह होता.
 
मंत्र्यांवर अजित दादांचा कंट्रोल नाही का?
रोहित पवार यांनी अजित पवारांवर विश्वास व्यक्त करताना सवालही उपस्थित केला – “दादा स्वतः पक्षप्रमुख आहेत. मात्र त्यांच्या मंत्र्यांकडून जर असं वर्तन केलं जात असेल, तर हे दाखवतं की मंत्र्यांवर त्यांचा नियंत्रण नाही का?”
 
कोकाटेंची प्रतिक्रिया – "मी काही गुन्हा केला नाही"
या सर्व टीकेला उत्तर देताना कोकाटे यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे. “राजीनामा द्यावा असा काही गुन्हा मी केलेला नाही. ना मी कुणाचा विनयभंग केला, ना चोरी केली. माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. ज्यांनी हा व्हिडिओ काढला त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. हलक्याफुलक्या गोष्टीवरून उगीचच वाद निर्माण केला जात आहे,” असे कोकाटे म्हणाले.
 
या वादामुळे आता मंत्रिमंडळात बदल होणार का? कृषी खात्याची धुरा अजित पवारांकडे जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.