‘सैयारा’ने चित्रपटगृहांवर उडवली धूळधाण; टायटल ट्रॅकमुळे फहीम अब्दुल्ला आला प्रसिद्धी झोतात!

    23-Jul-2025
Total Views |
 
Saiyara
 (Image Source-Internet)
 
मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘सैयारा’ (Saiyara) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. प्रत्येक ठिकाणी फक्त याच चित्रपटाचीच चर्चा रंगलेली दिसून येतेय. अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित जोडीच्या अभिनयाने रसिकांना भुरळ घातली असून, पहिल्याच सिनेमातून या दोघांची कारकीर्द झपाट्याने उंचावली आहे. पण या यशस्वी प्रवासात आणखी एक नाव विशेषत्वाने चर्चेत आलंय – फहीम अब्दुल्ला.
 
‘सैयारा’ या चित्रपटाचं शीर्षकगीत सध्या सगळीकडे घुमत आहे आणि हेच गाणं गायक फहीम अब्दुल्लाच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरलं. मूळचा काश्मीरचा रहिवासी असलेला फहीम, मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी आला होता. स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असलेला हा कलाकार अनेक वर्षे संघर्ष करत होता. त्याच्या जुन्या मित्रासोबत त्याने हे गाणं संगीतबद्ध केलं आणि तनिष्क बागची यांच्या माध्यमातून ते मोठ्या पडद्यावर झळकलं.
 
सुरुवातीला केवळ १४ दिवसांचा खर्च उरलेला असतानाच त्यांची तनिष्कसोबत भेट झाली आणि फक्त तेरा दिवसांत फहीमचं नशीब उजळलं. या टायटल ट्रॅकमुळे फहीम आज सोशल मीडियावर, म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड करत आहे. गायक म्हणून त्याचं नाव चर्चेत आलं असलं तरी, तो एक गीतकार, कवी, चित्रपट निर्माता आणि कार्यक्रम संयोजकही आहे.
 
दिग्दर्शक मोहित सुरी यांचा ‘सैयारा’ प्रेक्षकांच्या मनात घर करत चालला आहे. तरुणाईला भावणारी कहाणी, संगीत आणि अभिनय यांचं अफलातून मिश्रण या सिनेमात पहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट वाऱ्याच्या वेगाने कमाई करत आहे. अवघ्या चार दिवसांत शंभरी पार करणाऱ्या या सिनेमाने पाचव्या दिवशी आणखी एक कोटींचा टप्पा पार केला.
 
रविवारी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, सोमवार आणि मंगळवार अशा वीकडेजमध्येही ‘सैयारा’ने कमाईचा जोर कायम ठेवला. पहिल्या दिवशी २१ कोटींनी सुरुवात करून पाचव्या दिवशी एकूण कलेक्शन १३२ कोटींच्या पुढे गेलंय. समीक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांची तोंडी प्रसिद्धी यामुळे ‘सैयारा’ला आजच्या काळातला ‘जेन झी’चा डीडीएलजे म्हटलं जातंय.
 
एकूणच, ‘सैयारा’ हा केवळ एक सिनेमा नसून, अनेक कलाकारांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला आहे. विशेषतः फहीम अब्दुल्लासाठी तर हे गाणं आयुष्य बदलून टाकणारा क्षण ठरला, हे निश्चित.