(Image Source-Internet)
मुंबई :
भारतात #MeToo चळवळीची सुरूवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) नुकताच एक भावनिक आणि धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रडत-रडत आपले हालकष अनुभव सांगताना दिसते. स्वतःच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत तिने अनेकांना हादरवून टाकलं आहे.
या व्हिडीओमध्ये तनुश्री स्पष्ट शब्दांत सांगते की, “मी फार गंभीर परिस्थितीतून जात आहे. पोलिसांना बोलावलं होतं, पण त्यांनी सांगितलं की थेट तक्रार द्यायची असेल तर स्टेशनला जा. पण मी आता खूप आजारी आहे, काम करू शकत नाही. मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत आहे.”
तिच्या या विधानांमुळे तिच्या आयुष्यातील व्यथा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे तिने थेट कोणाचेही नाव घेतलेले नसले, तरी तिचा रोष ‘घरातील’ व्यक्तींकडे असल्याचे संकेत या व्हिडीओतून मिळत आहेत. त्यामुळे तिच्या कुटुंबातील काहीजणांचाच यात समावेश असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेक चाहते आणि सेलिब्रिटी तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. काहींनी तिच्या मानसिक आरोग्यासाठी चिंता व्यक्त केली असून, काहींनी तिच्या पूर्वीच्या अनुभवांचा दाखला देत यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तनुश्री दत्ता ही २००४ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स’ ठरली होती आणि ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. 'आशिक बनाया आपने', 'चॉकलेट', 'ढोल', 'भागम भाग' यांसारख्या चित्रपटांत ती झळकली. मात्र, २०१३ नंतर तिने सिनेसृष्टीपासून फारकत घेतली होती. २०१८ मध्ये तिने अभिनेता नाना पाटेकर आणि 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाशी संबंधित लोकांविरोधात लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत देशभरात चर्चेचे वादळ उठवले होते.
आता पुन्हा एकदा तिचा व्यथा-वेदनांनी भरलेला आवाज ऐकू येतो आहे. तिच्या या गंभीर आरोपांची योग्य ती चौकशी व्हावी, अशी मागणी तिचे समर्थक करत आहेत.