उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; आरोग्य कारणास्तव पद सोडल्याची माहिती

22 Jul 2025 13:39:31
 
Jagdeep Dhankhar
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला असून, आरोग्य कारणाचा हवाला देत त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी आपले कृतज्ञता व्यक्त करतानाच राजीनाम्याची अधिकृत माहिती दिली.
 
धनखड यांनी आपल्या पत्रात लिहिले की,
“आरोग्याची अधिक काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार, मी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६७(अ) अंतर्गत, उपराष्ट्रपतीपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.”
 
या पत्रात त्यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की,
“पंतप्रधानांचे मार्गदर्शन आणि पाठबळ माझ्यासाठी अतिशय मोलाचे ठरले. त्यांच्या सहकार्यामुळे मी माझ्या कार्यकाळात बरेच काही शिकलो.”
 
संसदेतील सदस्यांचाही केला उल्लेख-
धनखड यांनी सर्व खासदारांकडून मिळालेल्या स्नेह आणि विश्वासाचेही विशेष उल्लेख करत आभार मानले. त्यांनी म्हटले की,
“या पदावर असताना मला संसदीय व्यवहारात अमूल्य अनुभव आणि अंतर्दृष्टी मिळाली. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी भाग्याचे आहे.”
 
इतिहासातील पहिली वेळ: कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा-
धनखड हे २०२२ मध्ये देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली होती. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांचा ५२८-१८२ मतांनी पराभव केला होता.
 
मात्र, त्यांच्या कार्यकाळातच राजीनामा देणारे ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया होणार असून, देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदावर कोण विराजमान होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0