(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशाचे उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. सध्या संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता देशाला नवा उपराष्ट्रपती मिळणार असल्याने, संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर?
सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष राहिलेले हरिभाऊ बागडे हे उपराष्ट्रपतीपदासाठी संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आणि साधी राहणी यामुळे त्यांचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हरिभाऊ बागडे यांचा संघर्षमय प्रवास-
पाच वेळा आमदार (फुलंबरी मतदारसंघातून)
लहानपण शेतकरी कुटुंबात, आर्थिक अडचणीतून वाटचाल
वृत्तपत्र विक्री करत करत शिक्षण आणि संघर्ष
'कृषी योग' हे विशेष नाव, शेतीप्रेमामुळे मिळालं
1985 मध्ये पहिल्यांदा आमदार
1995 मध्ये रोहयो मंत्री
2009 मध्ये पराभव, पण 2014 व 2019 मध्ये पुन्हा विजयी
2014 ते 2019 – विधानसभाध्यक्ष
2024 मध्ये राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
राजकीय वजन आणि विश्वासार्हता-
हरिभाऊ बागडे हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. साधेपणा, अनुभव आणि संघटनेशी असलेलं नातं लक्षात घेता, पक्षश्रेष्ठींमध्ये त्यांचं नाव विश्वासाने घेतलं जातं. त्यामुळेच उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांची उमेदवारी गंभीरपणे विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी देशभरात चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील एक मातब्बर, कष्टाळू आणि अनुभवी नेता पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरिभाऊ बागडे हे नाव पक्षांतर्गत चर्चांमध्ये आघाडीवर असून, अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.