नागपुरात उभा राहणार एकता कपूर यांचा भव्य स्टुडिओ; गडकरींची महत्त्वपूर्ण घोषणा

    21-Jul-2025
Total Views |
 
Ekta Kapoor Nitin Gadkari
 (Image Source-Internet)
नागपूर :
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) लवकरच नागपूरमध्ये एक भव्य स्टुडिओ स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली. यामुळे विदर्भातील कलाक्षेत्राला आणि स्थानिक कलाकारांना नवी दिशा मिळणार आहे.
 
गडकरी म्हणाले की, त्यांनी अभिनेता जितेंद्र आणि एकता कपूर यांना नागपुरातील एक जागा पाहण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि ती जागा त्यांना पसंत पडली आहे. एकता कपूर यांनी नागपूरची मुंबईशी असलेली चांगली जोड आणि सोयीस्कर वाहतूक यंत्रणा पाहता, येथे स्टुडिओ स्थापन करणं फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे नागपूरात लवकरच मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
 
याआधीही विदर्भात फिल्म सिटी उभारण्याचा प्रयत्न झाला होता. आता एकता कपूर यांच्या पुढाकारामुळे नागपूर मनोरंजन उद्योगाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकू शकेल.
 
दरम्यान, अंभोरा परिसरात पर्यटन विकासासाठीही अनेक योजना साकार होत असून, गडकरी यांनी रशियातून आणले जाणाऱ्या होव्हरक्राफ्ट्सद्वारे जलक्रीडा सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं. काचेच्या तळाचा पूल, रेस्टॉरंटसारख्या सुविधा आधीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
 
गडकरी म्हणाले की, पर्यटनात होणारी गुंतवणूक ही स्थानिक रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामुळे विदर्भाचा सर्वांगीण विकास साधता येईल.
 
एकूणच, नागपूरच्या सांस्कृतिक, पर्यटन व आर्थिक क्षेत्राला एकता कपूर यांच्या स्टुडिओ आणि अंभोरा प्रकल्पांमुळे नवसंजीवनी मिळणार आहे.