विरोधकांकडून केवळ हवेत आरोप;हनीट्रॅप प्रकरणावरून बावनकुळे संतप्त

    21-Jul-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 (Image Source-Internet)
नागपूर :
नाशिकच्या बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणामुळे (Honey trap case) राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. विरोधकांकडून केवळ हवेतून आरोप केले जात आहेत, त्यांच्याकडे जर खरोखर कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते सरळ विधानसभेत मांडावेत, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं.
 
बावनकुळे म्हणाले की, सध्या विरोधक जनतेला गोंधळात टाकण्यासाठी योजना आखून काम करत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. उलट, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हेतुपुरस्सर राजकारण खेळलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली असून, सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
 
संजय राऊत, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची थेट नावं न घेता बावनकुळे यांनी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. काही खास मंडळीच माहिती हाताळत असून, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी वापरली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांना टीआरपीसाठी विषय हवा आहे आणि म्हणूनच अफवांच्या आधारे वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी जोडकली.
 
दरम्यान, गिरीश महाजन यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, एखाद्याशी सामाजिक किंवा राजकीय संबंध असणे म्हणजे तो गुन्हेगार आहे, असं समजणं चुकीचं आहे. कोणीही कुणावरही केवळ नाव घेऊन आरोप करत असेल, तर त्यामागे तथ्य असावं लागतं. अन्यथा अशा प्रकारची बदनामी अक्षम्य आहे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.