(Image Source-Internet)
मुंबई :
नाशिकमध्ये गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा (Praful Lodha) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातून ५ जुलै रोजी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले असून, यामध्ये पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा, बलात्कार, आणि ब्लॅकमेलिंग यांचा समावेश आहे.
या आरोपांनुसार, लोढा यांनी दोन अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केलं, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच, या मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोपही आहे. ही घटना मुंबईतील 'लोढा हाऊस' येथे घडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना, मुंबई पोलिसांनी जळगाव, जामनेर आणि पहूरमधील लोढा यांच्या घरांवर छापे टाकून मोबाइल, ड्राईव्ह, सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
राजकीय पार्श्वभूमी पाहता, प्रफुल्ल लोढा हे जामनेरचे असून, एकेकाळी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख निर्माण केली.
या प्रकरणाचा पहिला मोठा खुलासा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यांनी एका पेन ड्राईव्हमध्ये असलेली माहिती सादर करत मोठे गौप्यस्फोट केले. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठा वादंग निर्माण केला आहे.
सध्या या प्रकरणात सात दशकभर अधिकारी आणि काही वरिष्ठ राजकीय नेते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. पोलिसांच्या चौकशीत आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगाव ते मुंबईदरम्यानचे राजकीय नेटवर्क तपासाच्या केंद्रस्थानी आहे.