ढाका येथे शाळेवर कोसळलं बांगलादेश हवाई दलाचं लढाऊ विमान, एक मृत, चार जखमी

21 Jul 2025 18:35:30
 
Bangladesh Air Force
 (Image Source-Internet)
ढाका (बांगलादेश) :
बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथे सोमवारी एक भीषण अपघात घडला. हवाई दलाचं F-7 BGI हे प्रशिक्षण लढाऊ विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं. या अपघातात एक व्यक्ती ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
ही घटना ढाकाच्या उत्तरेकडील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या परिसरात दुपारी घडली. त्यावेळी शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित असल्यामुळे प्रचंड घबराट पसरली. विमान कोसळताच परिसरात प्रचंड आगीचा भडका उडाला.
 
बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क विभागाने या दुर्घटनेची अधिकृत माहिती दिली आहे. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
 
याआधीही अशाच दुर्घटना-
अशाप्रकारच्या अपघातांची मालिका याआधीही पाहायला मिळाली आहे. भारतातही यापूर्वी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग 787-8 प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये 242 प्रवाशांपैकी फक्त एकजण वाचला होता.
 
चौकशी सुरू-
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर F-7 BGI विमानाच्या तांत्रिक क्षमतेवर आणि हवाई दलाच्या प्रशिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बांगलादेश लष्कर आणि हवाई दलाकडून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळेच अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0