(Image Source-Internet)
मुंबई :
सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अलीकडील काही दिवसांपासून आर्थिक आरोप, व्हिडिओ वाद, आणि आता थेट त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापलं आहे.
अज्ञात व्यक्तीकडून मध्यरात्री दगडफेक-
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दीड वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. अज्ञात व्यक्तीने संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली आणि परिसरात आरडाओरड करत गोंधळ घातला. यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव सौरभ घुले असल्याचे स्पष्ट झाले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
व्हिडीओ वादाने आधीच वादळ उठलेले-
या घटनेपूर्वी संजय शिरसाट एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. व्हिडीओत ते सिगारेट ओढताना आणि बाजूला कथितरित्या पैशांनी भरलेली बॅग ठेवलेली असल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी "इतकी रोकड कुठून आली?" असा सवाल उपस्थित केला होता.
संजय शिरसाट यांचा खुलासा-
शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "व्हिडीओ खरा असला तरी बॅगमध्ये पैसे नव्हते, ती कपड्यांची बॅग होती." त्यांनी व्हिडीओ मॉर्फ केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
राजकीय प्रतिमा धक्क्यात?
संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरमधील मजबूत राजकीय नेतृत्व मानले जातात. मात्र एकामागोमाग एक आरोप, व्हिडीओ वाद आणि आता घरावर हल्ल्याचा प्रयत्न या साऱ्या घटनांमुळे त्यांची राजकीय प्रतिमा डागाळली जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. संजय शिरसाट यांच्यावर सुरू असलेलं वादांचं सावट आणि वाढती राजकीय टीका लक्षात घेता, पुढील काही दिवस त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पोलिसांकडून हल्ल्याच्या घटनेचा तपास सुरु असून, यामागील खरे कारण काय आहे, हे लवकरच समोर येणे अपेक्षित आहे.