(Image Source-Internet)
नागपूर :
विधीमंडळाच्या सत्रादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी (Rummy) खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली असून विरोधकांनी कृषी मंत्री आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे कृषी मंत्री रम्मी खेळत मजा घेत आहेत. ही शरमेची बाब आहे. त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं, "ही अंध सरकार आहे, जनतेशी यांना काहीही देणं-घेणं नाही."
वडेट्टीवारांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. "दररोज ८ ते १० शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबले आहेत. फसल विमा योजनेचे नियम बदलण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पूर्ण विमा रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. निवडणुकीच्या वेळेस एक रुपयांत विमा आणि आता – ‘तुमचं तुम्ही पाहा’ – अशी भूमिका सरकारने घेतली आहे," असा आरोप त्यांनी केला.
कोकाटे केवळ नावापुरते मंत्री-
वडेट्टीवारांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, "कोकाटे यांना केवळ नावापुरते मंत्री बनवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. जेव्हा जबाबदारी नाही, तेव्हा कामही नाही. म्हणूनच ते वेळ घालवण्यासाठी रम्मी खेळत आहेत."
मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा –
विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, राज्यात गुन्हेगार आमदार, लुंगी घालणारे मंत्री, मोकाट फिरणारे गुंड हे सरकारच्या संरक्षणाखाली आहेत. ही सरकार शेतकऱ्यांची नव्हे, बेईमानांची झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना सरकारमधून हाकलून देणं गरजेचं आहे.