HSRP नंबर प्लेट नसेल तर वाहन व्यवहार अडचणीत; परिवहन विभागाचा निर्णायक निर्णय

02 Jul 2025 15:55:33
 
HSRP number plate
 (Image Source-Internet)
मुंबई :
वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणं अनिवार्य करण्यात आलं असून, जुन्या वाहनांनाही ही अट लागू करण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप हा नियम पाळलेला नाही, त्यामुळे परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे.
 
राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर HSRP लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तरीदेखील राज्यभरात केवळ 8 टक्केच वाहनांवर ही प्लेट बसवण्यात आली आहे. परिणामी, अशा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर थेट परिणाम होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नव्या आदेशानुसार, HSRP नसलेल्या जुन्या वाहनांचे ट्रान्स्फर आता थांबवले जाणार आहे.
 
RTO कामकाजावरही परिणाम-
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांसंदर्भात आरटीओकडून कोणत्याही प्रकारचे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. यामध्ये फिटनेस प्रमाणपत्र, वाहन नोंदणी नूतनीकरण, ट्रान्स्फर प्रक्रिया, वाहन रचना बदल यांचा समावेश आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, ही प्लेट सर्व वाहनांसाठी आवश्यक असल्याने या नियमाची अंमलबजावणी अनिवार्य करण्यात आली आहे.
 
खरेदी-विक्री व्यवहार ठप्प होण्याची शक्यता-
या नव्या निर्णयामुळे जुन्या वाहनांची खरेदी-विक्री प्रक्रिया अडथळ्यात येऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने HSRP प्लेट बसवावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे. ही अंमलबजावणी आता लांबणीवर टाकली जाणार नाही, कारण विभाग पातळीवर कडक अंमलबजावणीसाठी तयारी करण्यात आली आहे.
 
तांत्रिक सुरक्षा आणि बनावट नंबर प्लेटवर लगाम-
HSRP प्लेट केवळ कायदेशीर अनिवार्यता नाही, तर बनावट नंबर प्लेट्सच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने हा निर्णय निर्णायक मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0