(Image Source-Internet)
मुंबई :
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात उभ्या राहिलेल्या मराठी जनतेच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. सरकारने हिंदी सक्ती संदर्भातील जीआर मागे घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. "संयुक्त महाराष्ट्राच्या काळात मराठी माणूस एकवटला होता, तसंच आता देखील एकजूट होईल या भीतीने सरकारनं निर्णय मागे घेतला," असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे आणखी एक पत्रक जाहीर केलं आहे. "महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे," असं स्पष्ट करत त्यांनी एका भव्य जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
हा मेळावा ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता वरळीतील डोम येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा मेळावा केवळ भाषेच्या प्रश्नापुरता मर्यादित न राहता, आगामी राजकीय घडामोडींनाही दिशा देईल, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.