शिवसेनेचा 'धनुष्यबाण' चिन्हावर वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात;१६ जुलै रोजी होणार सुनावणी

02 Jul 2025 16:56:29
 
Shiv Sena
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
शिवसेनेच्या (Shiv Sena) धनुष्यबाण चिन्हावर असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत पोहोचला आहे. उद्धव ठाकरे गटाने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणूक चिन्हाच्या अधिकारावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी नाकारली आणि या मुद्द्यावर १६ जुलै रोजी नियमित खंडपीठासमोर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.
 
उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची वेळ समोर ठेऊन, धनुष्यबाण चिन्हावर तात्काळ निर्णय होणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. परंतु, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यावर तत्काळ निर्णय न घेण्याचे ठरवले.
 
शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले की, निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी धनुष्यबाण चिन्हाचे अधिकार शिंदे गटाच्या पक्षात दिले आहेत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या चिन्हाचा वापर झाला आहे. त्यामुळे, तात्काळ सुनावणी घेण्याची गरज नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.
 
याआधी ७ मे रोजीही उद्धव ठाकरे गटाने हीच मागणी केली होती, पण न्यायालयाने त्या वेळी देखील तत्काळ सुनावणी नाकारली होती. राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जाणारा हा मुद्दा १६ जुलै रोजी होणाऱ्या नियमित खंडपीठाच्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा परिणाम दोन्ही गटांच्या भवितव्यावर होऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0