नागपूरच्या हॉटेल सर्गममधील सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा; आरोपी अटकेत

    02-Jul-2025
Total Views |
- दोन महिलांची सुटका

Police raid(Image Source-Internet)  
नागपूर :
शहरातील वाठोडा भागातील बिडगाव परिसरात असलेल्या हॉटेल सर्गममध्ये सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटवर नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही धडक कारवाई १ जुलै रोजी दुपारी तीन वाजता सुरू होऊन सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू होती.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर टाकलेल्या छाप्यात अतुल संजय भारती (वय ३१) हा जबरदस्तीने महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. घटनास्थळी दोन मोबाईल फोन, डीव्हीआर, रोख तीन हजार रुपये आणि इतर साहित्य असा एकूण ६१ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १४३(२) आणि अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PITA) कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वाठोडा पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणिकर, सहाय्यक आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाणे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
या ऑपरेशनमुळे परिसरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर व अमानवी व्यवहारांवर अंकुश बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.