हिमाचल प्रदेशमध्ये निसर्गाचा तडाखा; एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; १० मृत, ३० बेपत्ता

02 Jul 2025 13:59:44
 
Himachal Pradesh
 (Image Source-Internet)
शिमला :
हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) मंगळवारी (१ जुलै) निसर्गाचा भीषण तांडव पाहायला मिळाला. राज्यात विविध ११ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या असून, अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलन झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण बेपत्ता आहेत. बेपत्तांमध्ये एका कुटुंबातील सहा सदस्यांचाही समावेश आहे.
 
सर्वात मोठा फटका मंडी जिल्ह्याला बसला असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अवघ्या २४ तासांत मंडीमध्ये २५३.८ मिमी पाऊस पडला आहे. गोहर, करसोग, धरमपूर आणि थुनाग येथे मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली.
 
ढगफुटीमुळे नद्यांना पूर आल्याने अनेक भागांमध्ये शेकडो झाडे उन्मळून पडली असून, घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चुलाथाजमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे लोकांना जीव वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. पुरात अनेक नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने शोध व बचाव मोहीम सुरू केली असून, एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
 
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या आपत्तीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यात सध्या ५०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे आणि हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
 
मंडी, ऊना, बिलासपूर, हमीरपूर आणि शिमला जिल्ह्यांना पुढील काही तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नद्या धोक्याच्या पातळीवर असून, प्रशासन सतर्कतेच्या आदेशावर कार्यरत आहे. अनेक रस्ते वाहून गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयांनाही तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.
 
राज्य शासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूरग्रस्त भागात अन्न, पाणी आणि तात्पुरते निवारा उपलब्ध करून देत आहेत. दरम्यान, नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0