(Image Source-Internet)
घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात. भीक मागून पोटाची खळगी भागवत असतात. यातील काही मुले वाम मार्गाला लागतात तर काही मुले असेच अनाथ म्हणून भटकत असतात. तर काही मुलांना गुंड मवाली जबरदस्तीने भीक मागायला लावतात. त्या मुलांचा गुंड मवाली अतोनात छळ करत असतात. या मुलांना पुन्हा स्वगृही पाठवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ( आर पी एफ ) नन्हे फरिश्ते ही मोहीम राबवली.
या मोहिमे अंतर्गत एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील वेगवेगळ्या स्थानकांत रेल्वे संरक्षण दलाच्या विशेष पथकाने ( आरपीएफ) २३५ मुलांचा शोध घेऊन या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
ही सर्व मुले १२ ते १५ वयोगटातील आहेत. एकट्या पुणे स्थानकात एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ५१ मुलांचा शोध घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने ( आरपीएफ ) या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे शोधलेल्या या मुलांमध्ये पोलीस ठाण्यात नोंद नसलेलीही काही मुले आहेत. ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही मोहीम रेल्वे सुरक्षा दलाकडून मागील सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. २०१८ मध्ये ऑपरेशन नन्हे फरिश्ते या मोहिमेची सुरुवात झाली. आपल्या आई वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात पळून आलेली, हरवलेल्या अल्पवयीन मुला मुलींना पुन्हा आपले आई वडील मिळावेत, त्यांना त्यांचे घर पुन्हा मिळावे यासाठी ही मोहीम राबवली जाते. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही मोहीम राबवली जाते.
या मोहिमे अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे डब्यात, रेल्वे स्थानकात किंवा रेल्वेच्या हद्दीत हरवलेल्या किंवा पुण्या - मुंबईत पळून आलेल्या हजारो मुलांची सुटका केली. या मोहिमेमुळे हजारो अल्पवयीन मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून आई वडिलांकडून, कुटुंबापासून दुरावलेली हजारो मुले आपल्या आई वडिलांच्या कुशीत सामावली आहेत. ही मोहीम राबवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष आराखडा तयार केला. रेल्वेच्या हद्दीत ज्या ठिकाणी अल्पवयीन मुले मुली भीक मागत आहेत अशी ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली. या ठिकाणी पोलिसांनी अतिशय गुप्तपणे कारवाई केली. या मुलांना भीक मागायला लावणाऱ्या रॅकेटचा शोध घेतला आणि त्यांना अटक करून हजारो मुलांची सुटका केली. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन या मुलांचे प्रबोधन करण्यात आले. या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याचे मोठे आव्हान रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांसमोर होते. ते आव्हान पोलिसांनी लीलिया पेलले आहे. ही मोहीम अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय अशी आहे. ही मोहीम राबवणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने ही मोहीम राबवून हजारो मुलामुलींना अनाथ होण्यापासून आणि वाम मार्गाला लागण्यापासून वाचवले आहे. ही मोहीम राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागेल. मुंबई पोलीस दलातर्फे देखील 'ऑपरेशन मुस्कान' नावाची अशीच एक मोहीम राबविण्यात येते. या मोहीमे अंतर्गत देखील हजारो मुलामुलींना त्यांच्या पालकांकडे, कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते, ऑपरेशन मुस्कान या सारख्या मोहिमा फक्त पुण्या - मुंबई पुरत्याच मर्यादित न राहता सर्व महानगरात राबवायला हव्यात म्हणजे बेघर झालेली लाखो मुले स्वगृही परततील आणि स्वगृही परतणाऱ्या या मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५