३ कोटी २० लाखांच्या बनावट निधी प्रकरणाचा पर्दाफाश; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

    02-Jul-2025
Total Views |
 
MLA Prasad Lad
 (Image Source-Internet)
मुंबई :
विधान परिषदेचे भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. लाड यांनी विधान परिषदेत माहिती दिली की, त्यांच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून ३.२० कोटी रुपयांचा सरकारी निधी बीड जिल्ह्यासाठी वर्ग करण्याचा प्रयत्न काहींनी केला.
 
लाड म्हणाले, “अधिवेशन संपल्यानंतर रत्नागिरी येथील अधिकाऱ्याचा माझ्या मोबाईलवर फोन आला आणि सांगितलं की तुम्ही मागणी केल्यानुसार बीड जिल्ह्याला निधी वितरित केला आहे. मात्र मी असा कोणताही प्रस्ताव दिला नव्हता, त्यामुळे शंका आली.” यानंतर त्यांनी संबंधित पत्राची प्रत मागवली असता, त्यावरची सही आणि लेटरहेड बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
 
प्रसाद लाड यांनी यानंतर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. “सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार संशयितांची नावं पोलिसांना दिली आहेत,” असे लाड यांनी स्पष्ट केले.
 
त्यांनी सांगितले की, “हा प्रकार मोठा असल्याने लक्षात आला. मात्र अशा अनेक लहानमोठ्या निधींचा गैरवापर यापूर्वीही झाला आहे. आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांच्या बाबतीतही अशा घटनांचा अनुभव आहे. राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी मिळवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.”
 
लाड यांनी सभागृहात अशीही मागणी केली की, “आमदार निधी वाटप करताना तांत्रिक पद्धत वापरली जावी. निधी मंजूर करताना संबंधित आमदाराच्या मोबाईलवर ओटीपी पाठवावा आणि त्यानंतरच निधी वितरित करावा.”
 
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेचे सभापती यांनी पोलीस यंत्रणेला तत्काळ कारवाईचे निर्देश दिले असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
 
सरकारी निधीच्या गैरवापराचा हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला, मात्र यामागचे मास्टरमाइंड कोण, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.